कोल्हापुरात अमृतपेठ थेट बाजारपेठेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; जिल्हाधिकारी डॉ. येडगे यांनीही दिली भेट
कोल्हापूर : 'स्थानिक उद्योग आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृतपेठ - थेट बाजारपेठेसारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. या प्रदर्शनांमुळे स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल,' असे प्रतिपादन करवीर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी केले. १५ मार्च रोजी कोल्हापुरात भरवलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
स्थानिक उत्पादकांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राज्यातील विविध शहरांमध्ये राबवला जात आहे. १५ मार्च रोजी अमृत संस्थेने कोल्हापुरात करवीर ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले होते. उद्घाटनप्रसंगी ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष मधुसूदन धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, संचालक श्री. चौगले, व्यवस्थापक अशोक जोशी यांच्यासह सर्व कर्मचारी, बीबीएफ ग्रुपचे अध्यक्ष राजन छत्रे, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर आणि अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमोल येडगे यांनीही या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.
कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेत बिनखांबी गणेश मंदिराजवळ ब्राह्मण सभेत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनात १९ स्टॉल्स होते आणि महिला उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले होते. नागरिकांना विविध प्रकारची स्वदेशी आणि घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली. या प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने, तसेच आकर्षक हस्तकला वस्तू उपलब्ध होत्या. स्थानिक उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि ग्राहकांना दर्जेदार स्थानिक उत्पादने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कोल्हापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment