अशा प्रकारचे कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्याचा मानस
पुणे : लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम १४ मार्च रोजी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अमृतगंगा (गोयल गंगा) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
लघुउद्योग, गृहोद्योग, तसेच नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. कार्यक्रमात विविध उद्योजकांनी आपापल्या उत्पादनांचे स्टॉल लावून विविध प्रकारची उत्पादने ग्राहकांसमोर मांडली. ग्राहकांनीही खरेदी करून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक सचिन मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या माध्यमातून उद्योजकांना ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम विविध भागांत आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम लघुउद्योजकांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरत असून स्थानिक उत्पादनांना चालना देण्यास मदत होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment