अमृतपेठ थेट बाजारपेठेत विशेष विद्यार्थ्यांसाठी स्टॉल उभारण्याची संकल्पना
नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था उद्योजकतावाढीसाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेच्या नांदेड येथील अमृतसखी सौ. मनीषा कुनसावळीकर यांनी समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. नांदेडमधील आर. आर. मालपाणी मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन त्यांनी विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.
अमृतपेठ थेट बाजारपेठेत एक स्टॉल उभारून समाजातील अशा घटकांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली. या उपक्रमाचे स्वागत करून विद्यालयाचे मुख्याध्यापक ओमप्रकाश गिल्डा यांनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आणि अमृतपेठ येथे स्टॉल उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही दिली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसह अमृत कार्यालयाला भेट देण्याची आणि अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी व त्यांच्या टीमशी संवाद साधण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेच्या या उपक्रमातून विशेष घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत असून, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment