‘लोकल टू व्होकल’ संकल्पनेला बळ आणि नामांकित डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेण्याचीही संधी
अकोला : स्थानिक उद्योजकांना सक्षम व्यासपीठ मिळावे आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्याच्या विविध शहरांमध्ये यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून २८ व २९ मार्च २०२६ रोजी अकोल्यात ही बाजारपेठ भरवण्यात येणार आहे. यासोबतच मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले आहे.
अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. अमृतपेठ थेट बाजारपेठ हा त्याच प्रयत्नांतील एक भाग असून, या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारची आकर्षक उत्पादने खरेदी करता येणार आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला, दागदागिने, तसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.
‘लोकल टू व्होकल’ संकल्पनेला बळ देणे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विशेष म्हणजे, अकोल्यात अमृतपेठ या उपक्रमासोबतच मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व अकोला धर्मादाय रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांना सेवा देणार आहेत. सोलर हॉस्पिटलचे डॉ. केसान, वत्सल हॉस्पिटलचे डॉ. भागवत, समर्पण हॉस्पिटलचे डॉ. तुळजापुरे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राठी, बगाडिया हॉस्पिटलचे डॉ. बगडिया, होप हॉस्पिटलच्या डॉ. मंत्री, तसेच शुक्ला हॉस्पिटलचे डॉ. शुक्ला हे तज्ज्ञ डॉक्टर यामध्ये सहभागी होऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाला दुहेरी महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्थानिक उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला व्यवसाय व्यापक करावा. तसेच नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अकोला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुळकर्णी यांनी केले आहे.
‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा, स्वदेशी उत्पादनांना नवी ओळख देणारा आणि अकोल्यातील उद्योजकतेला नवी दिशा देणारा एक प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिवस आणि वेळ : २८ व २९ मार्च २०२६ - सकाळी १० ते रात्री १०.
स्थळ : डॉ. पार्थसारथी शुक्ल सभागृह, रामदास पेठ, अकोला
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227636, 7875995441, 8262833277
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment