उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार महापौर सौ. संगीता खांडेकर
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तीन ते पाच एप्रिल या कालावधीत चंद्रपूरमध्ये अमृतपेठ थेट बाजारपेठ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तीन एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी चंद्रपूरच्या महापौर सौ. संगीता खांडेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अमृत संस्थेचे नागपूर उपविभागीय व्यवस्थापक विक्रम पांडे यांनी महापौर सौ. खांडेकर यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. या वेळी पांडे यांनी महापौरांना अमृत संस्थेच्या विविध योजना, तसेच अमृतपेठ प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. सौ. खांडेकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारची आकर्षक उत्पादने खरेदी करता येणार आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला, दागदागिने, तसेच अनेक स्वदेशी उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनात असेल. त्यामुळे ग्राहकांसाठी हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.
‘लोकल टू व्होकल’ संकल्पनेला बळ देणे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह, गुणवत्तापूर्ण स्थानिक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला व्यवसाय व्यापक करावा. नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे यांनी केले आहे.
‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा, स्वदेशी उत्पादनांना नवी ओळख देणारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योजकतेला नवी दिशा देणारा एक प्रेरणादायी उत्सव ठरणार आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिवस आणि वेळ : तीन ते पाच एप्रिल २०२६. सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत
स्थळ : कन्यका परमेश्वरी हॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे – 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
श्रीरंग खोंड – 7057909073
वैष्णवीताई दारवेकर – 9689473020
जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment