उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते परभणीत अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन - अमृत महाराष्ट्र

उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते परभणीत अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन

३७ स्थानिक उद्योजकांचा सहभाग; पहिल्या दिवशी मिळाला चांगला प्रतिसाद

उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते परभणीत अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन मुख्य फोटो
उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते परभणीत अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन अतिरिक्त फोटो

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ या विशेष उपक्रमाचे २८ मार्च रोजी परभणी शहरात उद्घाटन झाले. स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागृती मंगल कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या उपक्रमात ३७ स्थानिक उद्योजकांनी सहभाग घेतला असून, पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. २९ मार्च रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन करताना अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील सर्व नागरिकांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा आणि अमृतपेठेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

अमृतपेठ उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आणि एल. आर. फार्मास्युटिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर राजूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यवसायवाढीसाठीच्या उपाययोजना सांगितल्या. व्यावसायिक कसा असावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वैश्य नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास देशपांडे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचे महत्त्व अधोरेखित करून लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त नागरिकांनी संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन अमृतपेठ थेट बाजारपेठ ही संकल्पना स्पष्ट केली. या वेळी अमृत संस्थेचे मराठवाडा विभाग व्यवस्थापक ओंकार शेटे, परभणी जिल्हा उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृतमित्र अनंतराव जोगदंड, अमृतसखी मयुरी टेळकीकर यांच्यासह डॉ. केदार खटिंग, नगरसेवक शंकर आजेगावकर, दी अकोला कमर्शियल को-ऑप बँकेचे परभणी शाखा सल्लागार समिती अध्यक्ष पुरणमल अग्रवाल, परभणी जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सुनील मुद्गलकर, केएनपी इन्स्टिट्यूटचे संचालक मेघःश्याम पत्की, सेवाभारती देवगिरी प्रांताच्या स्वावलंबन आयाम प्रमुख वैशाली मुळे, अमृत संस्थेचे लाभार्थी निखिल देशपांडे, पंकज पुरोहित, पवन शर्मा, विनोद पुरोहित, श्री. धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृतपेठ थेट बाजारपेठ :

दिवस आणि वेळ : २८ व २९ मार्च २०२६; सकाळी ९ ते रात्री ९ 

स्थळ : जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी

अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065473, 9623531601, 7875105557

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

जुनी प्रशासकीय इमारत, 

पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.  

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 29-03-2026 News publication date | Time: 12:28 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 29-03-2026 News publication date | Time: 12:28 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement