अमृत संस्थेच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेसाठी १० जणांनी केली नोंदणी
भोकर (जि. नांदेड) : ब्राह्मण समाजबांधवांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे अमृत परिवार सर्वेक्षण आणि जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. या अभियानात अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे, तसेच अमृतमित्र विश्वास बदापूरकर यांनी उपस्थित राहून परिवार सर्वेक्षण केले. या वेळी त्यांनी अमृत संस्थेच्या विविध जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचवली. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे अमृत संस्थेच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रमासाठी १० लाभार्थ्यांची यशस्वीरीत्या नोंदणी करण्यात आली.
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून त्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. या वेळी भोकर येथील ब्राह्मण समाजातील रामकृष्ण दासराव साकळकर, ओमकार माधवराव देशपांडे, चंद्रकांतराव बापुगुरू जोशी, सौ. सुरेखा चंद्रकांतराव जोशी, कुलदीप जोशी, कु. रचना रेणुकादास जोशी, सौ. भाग्यश्री अमोल देशपांडे आदींसह अनेक जण उपस्थित होते. 'अमृत परिवार सर्वेक्षण - जनतेच्या दारी, विकास प्रत्येकाच्या घरी!' या ब्रीदवाक्याला साजेसा प्रतिसाद भोकरमध्ये पाहायला मिळाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment