परभणी जिल्ह्यातील युवक-युवतींना सुवर्णसंधी; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन
परभणी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर परवानाही मिळणार असून इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे. अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जात असून, हा १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबविला जातो. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.
ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्वे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषतः ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगारनिर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो. नागरी विमान वाहतूक महासंचलनालय अर्थात डीजीसीएची सुरक्षित उड्डाण नियमावली, तसेच आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. कोर्स कालावधीतील १० दिवसांची राहण्याची-जेवण्याची व्यवस्था आणि खर्चही अमृत संस्थाच करते. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला ड्रोन विकत घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येऊ शकेल.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अनिरुद्ध काटे - 7391065473, 9623531601
परभणी जिल्हा व्यवस्थापक, अमृत
रवी कुलकर्णी - 7875105557
परभणी जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment