भंडाऱ्यात सिंधी समाजातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती

श्री पूज्य सिंधी पंचायतीतर्फे आयोजन

भंडाऱ्यात सिंधी समाजातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती मुख्य फोटो
भंडाऱ्यात सिंधी समाजातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती अतिरिक्त फोटो

भंडारा : श्री पूज्य सिंधी पंचायत या संस्थेच्या पुढाकारातून सिंधी कॉलनीतील गुरुनानक देव धर्मशाळेत निःशुल्क स्वास्थ्य चिकित्सक सेवा शिबीर १९ मे रोजी आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि लोककल्याणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ७०-७५ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, तपासणी, समुपदेशन आणि शंकासमाधान सेवा दिल्या. 'हे शिबीर समाजासाठी स्तुत्य उपक्रम असून, अशा शिबिरांद्वारे आरोग्यसेवेबरोबरच लक्ष्यित गटापर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचण्यास साह्य होईल,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास यांनी केले.

या शिबिरामध्ये होमिओपॅथी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी, सामान्य वैद्यकीय सेवा यांसारख्या विविध आरोग्यशाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा बजावली. डॉ. स्वाती बलवानी फतनानी यांनी मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीविषयी मार्गदर्शन केले, तर दंतचिकित्सक डॉ. सिमरन भोजवानी आणि डॉ. आकांक्षा भोजवानी यांनी दातांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. फिजिओथेरपिस्ट डॉ. मुस्कान भोजवानी यांनी शरीरसंतुलन, व्यायाम आणि वेदनानियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कशीश भोजवानी यांनी आरोग्य तपासणी करून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. 

या शिबिरामध्ये विशेष आकर्षण होते ते हर्बल उत्पादनांचे. अमृतपेठच्या लाभार्थी असलेल्या उद्योजिका सिमरन बुधवानी यांनी एल्प्युअर या ब्रँडअंतर्गत विविध नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादनांची माहिती दिली. पचनक्रियेसाठी उपयोगी चूर्ण, मधुमेह निवारण चूर्ण, मोरिंगा चूर्ण, आमला चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, ब्रह्मा चूर्ण, त्रिफळा चूर्ण यांसारख्या आरोग्य उत्पादनांविषयी नागरिकांनी उत्सुकता दर्शवून, खरेदी करून उद्योजिकेचे मनापासून कौतुक केले.

या वेळी अमृत संस्थेचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून अमृतमित्र हेमंत चंदवासकर आणि साक्षी जोशी यांनी शिबिराला भेट देऊन अमृत परिवार सर्वेक्षण उपक्रमांतर्गत २२ परिवार सर्वेक्षण फॉर्म भरून घेतले. नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजना, तसेच विविध संबंधित शासकीय योजना, प्रशिक्षण आणि सक्षमीकरण उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य उपाययोजनाही सुचवण्यात आल्या. 

श्री पूज्य सिंधी पंचायत संस्थेचे अध्यक्ष संतोष बलवानी, सोनू बलवानी, राजकुमार भोजवानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना अमृत संस्थेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. अजय बेलानी यांनी एकल पालक मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसाह्य योजना आणि विधुर/ विधवा अशा पालकांसाठी विशेष व्यावसायिक प्रशिक्षण योजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त करून अमृत संस्थेचे आभार मानले. 

या शिबिराने समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सेवाभाव, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांची माहिती पोहोचण्यास निश्चितच मदत होत आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 02:23 PM News publication time | Views: 277 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Omkar Hardas News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 02:23 PM News publication time | Views: 277 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement