पहिल्या सहामाहीकरिता मिळाले ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. देशातील नामांकित केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेचाही त्यात समावेश आहे. या योजनेचा लाभ सांगलीमध्ये राहणाऱ्या अथर्व सहस्रबुद्धे या गुणवंत विद्यार्थ्याला मिळाला आहे.
अथर्व सहस्रबुद्धे सध्या आयआयटी धनबाद या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेत यश मिळवून त्याने या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला आहे. त्याची जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे त्याने आपल्या स्वप्नांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अमृत संस्थेकडून या वर्षी अथर्वला पहिल्या सहामाहीकरिता ६० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. यामुळे त्याच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना अथर्व म्हणाला, 'अमृत संस्थेच्या या योजनेमुळे मला मोठा आधार मिळाला आहे. आर्थिक साह्यामुळे माझ्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. मला मिळालेल्या या अर्थसाह्याचा मी माझ्या शिक्षणासाठी सर्वोत्तम उपयोग करीन. अमृत संस्थेचा मी मनापासून आभारी आहे.'
अथर्वची आई सौ. दीपा सहस्रबुद्धे यांनीही समाधान व्यक्त केले. 'अमृत संस्थेने पालकांप्रमाणे अथर्वच्या शिक्षणाचा भार उचलला आहे याचा आम्हाला आनंद आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा पातळीवर मार्गदर्शन करून समन्वय साधल्याबद्दल अथर्व आणि त्याच्या आईने अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र शरद जहागीरदार यांचे विशेष आभार मानले. अथर्वचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अमृत संस्थेने त्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्ष्यित गटातील युवक-युवतींनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य संधी मिळाल्यास छोट्या शहरातील विद्यार्थीही देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अथर्व सहस्रबुद्धे होय. अमृत संस्था अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२८७६६
पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर, राजवाडा, सांगली
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment