खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी संस्था कार्यरत
वर्धा : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनांची माहिती घ्यावी आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश खराटे यांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अमृत बेकरी प्रशिक्षण योजना, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत आयात–निर्यात प्रशिक्षण योजना, ड्रोन ऑपरेटर (रिमोट पायलट) प्रशिक्षण योजना, इत्यादी योजना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येतात. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासाच्या दृष्टीने युवक, युवती व विद्यार्थ्यांसाठी अमृत संस्थेने IGTR, CDAC, NIELIT व CIPET या नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केलेले आहेत. तसेच, नवउद्योजकांसाठी इन्क्युबेशन सेंटर योजना राबविण्यात येत असून, यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसाह्य योजनेअंतर्गत, UPSC व MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य प्रदान करण्यात येते. शैक्षणिक अर्थसाह्य योजनेमध्ये IIT, IIM, IIIT, AIIMS यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपयांप्रमाणे एका वर्षात ११ महिने संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीपर्यंत अर्थसाह्य केले जाते. याशिवाय, ज्या उद्योजकांनी बँकेमार्फत स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेले आहे, अशा लाभार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत वैयक्तिक कर्जावरील व्याजपरतावा देण्यात येतो.
तुम्हालाही घ्यायचा आहे अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ?
अधिक माहितीसाठी संपर्क :
ऋषीकेश खराटे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
9112227632
पत्ता : अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा कार्यालय,
प्रशासकीय भवन, तळमजला,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वर्धा.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment