आगामी काळात जिल्ह्यात लाभार्थ्यांसाठी आणखी उपक्रम राबवण्यावर भर
नांदेड : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) लातूर येथील प्रकल्प अधिकारी श्री. गायकवाड यांनी अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
अमृत कार्यालयाच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तरुणांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे, नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृतच्या पालक अधिकारी सौ. मनीषा कुनसावळीकर आदी अधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे अमृत आणि 'एमसीईडी' यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, आगामी काळात जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment