महाराष्ट्रातील विविध घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अमृत – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री. आनंद जी दवे यांना देण्यात आली.
पुणे येथे आज झालेल्या या भेटीदरम्यान अमृतचे पुणे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रथमेश कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील पात्र युवक-युवती, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार तसेच विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रशिक्षण उपक्रम, शैक्षणिक संधी आणि संस्थेचे व्यापक सामाजिक उद्दिष्ट याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. प्रथमेश कुलकर्णी यांनी समाजातील गरजू व पात्र घटकांपर्यंत अमृतच्या योजनांची माहिती पोहोचविणे आणि अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, यावरही चर्चा करण्यात आली.
अमृतच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर श्री. आनंद जी दवे यांनी या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला. समाजातील अधिकाधिक युवक व नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या माध्यमातून लवकरच एक विशेष मेळावा आयोजित करून अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रस्तावित मेळाव्याच्या माध्यमातून अमृतच्या योजनांची थेट माहिती नागरिकांना मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा उपक्रम अमृत संस्था आणि समाजातील विविध घटक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती आणि मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अमृत संस्था आणि हिंदू महासभेच्या माध्यमातून आयोजित होणारा आगामी मेळावा हा समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment