नांदेड जिल्ह्यात ‘अमृत युवा ऊर्जा’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; नशामुक्त व फिट भारतासाठी Gen Z चा निर्धार!
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात डॉ. जयप्रकाश कुऱ्हाडे यांचे ‘नशामुक्त भारत व यंग इंडिया-फिट इंडिया’वर प्रभावी मार्गदर्शन
नांदेड जिल्ह्यात ‘अमृत युवा ऊर्जा’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; नशामुक्त व फिट भारतासाठी Gen Z चा निर्धार! राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात डॉ. जयप्रकाश कुऱ्हाडे यांचे ‘नशामुक्त भारत व यंग इंडिया-फिट इंडिया’वर प्रभावी मार्गदर्शन नरसी (नांदेड): राणी लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कनिष्ठ महाविद्यालय), नरसी येथे आज 'अमृत संस्था, नांदेड' यांच्या वतीने "अमृत युवा ऊर्जा" या विशेष कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आजच्या Gen Z (तरुण पिढी) युवकांना व्यसनमुक्ती आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देत, समृद्ध राष्ट्र पुनर्निर्माणात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री. नरेंद्र हाळे होते. तर औ.प्र.सं. नायगाव येथील IMC सदस्य श्री. सदानंद चुटेवाट आणि श्री. लक्ष्मण बुद्धलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यसनाधीनता आणि डोपामाईनचे गणित; डॉ. कुऱ्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन नायगाव येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. श्री. जयप्रकाश कुऱ्हाडे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित केले. व्यसनाची सुरुवात कशी होते, तिचे हळूहळू सवयीत कसे रूपांतर होते आणि मेंदूतील 'डोपामाईन' हे रसायण यामध्ये कसे कार्य करते, याचे अत्यंत शास्त्रीय व सोप्या भाषेत विश्लेषण त्यांनी केले. वाईट सवयी, कुसंगती आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत त्यांनी उपस्थित युवकांना अंतर्मुख केले. तसेच, 'यंग इंडिया - फिट इंडिया' या संकल्पनेअंतर्गत योग्य जीवनशैली, आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम आणि प्राणायाम याविषयी डॉ. कुऱ्हाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मांडले कौटुंबिक अनुभव; समृद्ध राष्ट्रासाठी दिली ग्वाही डॉ. कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनानंतर प्रेरित होऊन काही युवक-युवतींनी स्वतःहून पुढे येत आपल्या घरातील कौटुंबिक अनुभव मांडले. कुटुंबातील सदस्यांच्या व्यसनाधीनतेमुळे काय नुकसान होते, त्यावर ते सध्या कशी मात करत आहेत आणि इतर तरुणांनी व्यसनांपासून कसे दूर राहिले पाहिजे, यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत 'समृद्ध युवा ते समृद्ध राष्ट्र' या महायज्ञात आपले योगदान देण्याची ग्वाही दिली.
सामाजिक बांधिलकी आणि आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्री. सदानंद चुटेवाट यांनी कार्यक्रमाचा शेवट करताना Gen Z ची वैशिष्ट्ये आणि युवकांनी आपली कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी कशी जपावी, यावर सुंदर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्र. मुख्याध्यापक श्री. नरेंद्र हाळे यांनी अमृत संस्थेचे आभार मानत, "अशा अत्यंत महत्त्वाच्या व प्रबोधनात्मक उपक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत," असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची रूपरेषा आणि सहकार्य प्रारंभी अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी प्रास्ताविकातून 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमाची पार्श्वभूमी आणि ध्येय-उद्दिष्टे Gen Z युवकांसमोर मांडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता गोपछडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्र. मुख्याध्यापक नरेंद्र हाळे सर, डुमनवाड सर, वीरभद्रे सर, नाईकवाडे सर, नागुल सर, धुळेकर सर व सौ. समन मॅडम यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment