‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासनाची ओळख; रिसोड पोलीस ठाण्यात उपक्रम उत्साहात

रिसोड येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न

‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासनाची ओळख; रिसोड पोलीस ठाण्यात उपक्रम उत्साहात मुख्य फोटो
‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासनाची ओळख; रिसोड पोलीस ठाण्यात उपक्रम उत्साहात अतिरिक्त फोटो

रिसोड : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शासन व प्रशासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, तसेच शासन आणि सामान्य नागरिकांमधील दुरावा कमी व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाचे आयोजन आज रिसोड येथे करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत उत्तमचंद बगडिया विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रिसोड पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेतले. पोलीस ठाण्यातील विविध विभाग, त्यांचे कार्य, नागरिकांच्या तक्रारींची नोंद, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक आघाव साहेब, पीएसआय गीते साहेब तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

‘पोलीस हे नागरिकांचे मित्र’ – विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यावेळी पीएसआय गीते साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नागरिक शिष्टाचार, शुद्ध आचरण आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, आई-वडिलांचे नाव मोठे करावे आणि स्वतःची आचारसंहिता ठरवून त्यानुसार जीवन जगावे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यातील विविध विभाग कोणत्या पद्धतीने काम करतात, नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जातात आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका काय असते, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे आणि कोणत्याही परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहनही करण्यात आले. तसेच ‘पोलीस हे सामान्य नागरिकांचे मित्र आहेत’ हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

व्यसनांपासून दूर राहा, देशभक्तीची भावना जोपासा कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन करताना ठाणेदार श्री. रामेश्वर चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहण्याचा संदेश दिला. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून, त्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि देशभक्तीची भावना मनात रुजवावी, असे त्यांनी सांगितले.

“आजचे विद्यार्थी उद्याचे अधिकारी, प्रशासक, समाजनेते आणि देशाचे कर्तृत्ववान नागरिक होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आतापासूनच चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि देशसेवेची भावना अंगीकारावी,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

अमृत आणि शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची ओळख करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील प्रशासनाविषयीची भीती दूर होऊन त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.

भविष्यातील अधिकारी घडविण्याची प्रेरणा ‘अमृत संवाद सेतू’चा मुख्य उद्देश केवळ विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांची माहिती देणे एवढाच नसून, शासनाच्या विविध योजना, प्रशासनाची कार्यपद्धती आणि नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे, हा आहे. आज शाळेत शिकणारा विद्यार्थी उद्या प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे काम जवळून पाहावे, त्यातून प्रेरणा घ्यावी आणि भविष्यात अधिकारी झाल्यानंतर तन-मन-धनाने समाजाची व देशाची सेवा करावी, या भावनेतून ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

शाळेचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमात उत्तमचंद बगडिया विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी सर, खेडेकर मॅडम, डॉ. कोमल काळे मॅडम, डॉ. अरविंद मनवर सर, प्राध्यापक टीकार सर, संजना वानरे मॅडम, प्राध्यापक श्वेता बोंडे मॅडम, विठ्ठल वाघ सर, सुमित लाव्हरे सर यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील कामकाज जाणून घेताना विविध प्रश्न विचारून पोलिसांशी संवाद साधला. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक अनुभव न राहता प्रशासन, कायदा, शिस्त, नागरिकत्व आणि देशसेवा यांची प्रत्यक्ष ओळख करून देणारा प्रेरणादायी अनुभव ठरला.

‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात निर्माण होणारा हा संवाद भविष्यात अधिक सक्षम, जागरूक, शिस्तप्रिय आणि जबाबदार नागरिक घडविण्यास निश्चितच हातभार लावेल.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 11:45 AM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 11:45 AM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement