अकोट तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांचा ‘अमृत संवाद सेतू’; प्रशासनाची कार्यपद्धती जाणून घेतली
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या "अमृत संवाद सेतू" उपक्रमांतर्गत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील विद्यार्थ्यांची अकोट तहसील कार्यालयास शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी मा. तहसीलदार श्री. सुनील चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महसूल प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय सेवांमधील संधी, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व तसेच करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनातील कामकाजाची सखोल माहिती मिळाली.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तसेच शासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयीची उत्सुकता आणि जागरूकता अधिक वृद्धिंगत झाली.
यावेळी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील प्रा. संतोष कायंदे सर व प्रा. शिल्पा सपकाळ मॅडम, अमृत संस्थेचे अकोला जिल्हा उपव्यवस्थापक श्री. गणेश मुळे तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक श्री. सुनील सुरतने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देत त्यांच्यात नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि करिअरविषयक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment