उद्योजकतेच्या दिशेने नवी भरारी; प्रशिक्षणार्थींमध्ये स्वावलंबनाचा आत्मविश्वास
धुळे : अमृत संस्थेच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षण बॅचचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास नाशिक विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेशजी खाडीलकर तसेच श्री. संजय गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. मंगेशजी खाडीलकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या यशस्वी लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी श्री. मंगेशजी खाडीलकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना EDP प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवसाय उभारण्यासाठी करावा आणि नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन केले. उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यासाठी उपलब्ध संधींचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि लाभार्थींना उपलब्ध असलेल्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. युवक-युवतींनी कौशल्यविकास व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, यासाठी अमृतच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
EDP प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकीय कौशल्ये याबाबत मार्गदर्शन मिळाल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
यावेळी अमृत धुळे जिल्हा व्यवस्थापक श्री. हेमंत पाठक यांनी उपस्थित लाभार्थींना अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वावलंबी व सक्षम उद्योजक होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रमाणपत्र वितरणाचा हा कार्यक्रम प्रशिक्षणार्थींसाठी केवळ प्रमाणपत्र मिळविण्याचा क्षण न ठरता, स्वतःच्या व्यवसायाची नवी सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारा आणि आत्मविश्वास वाढविणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment