अमृत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीने ‘जेन झी – राष्ट्रासाठी एक दिवस’ या उपक्रमाचे आयोजन बल्लारपूर येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) येथे करण्यात आले. या उपक्रमात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. श्रीकांत सुंदरगिरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका, सामाजिक बांधिलकी तसेच ज्ञान व कौशल्याचा समाजहितासाठी उपयोग करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. युवकांनी आपल्या वेळेचा, ज्ञानाचा आणि कौशल्याचा काही भाग समाजाच्या विकासासाठी देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘राष्ट्रासाठी एक दिवस’ या संकल्पनेतून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सकारात्मक योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. युवकांच्या ज्ञान-कौशल्याचा समाजहितासाठी उपयोग झाल्यास विविध क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी, जबाबदार नागरिकत्व आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी हरीश दंडलवार सर, ज्योती मॅडम तसेच अमृत संस्थेचे अमृत मित्र सतीश नारायणदास उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment