महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून ‘अमृत संवाद सेतू’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, प्रशासन व्यवस्था, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. तसेच प्रत्यक्ष मा. उप विभागीय अधिकारी यांचे स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
ता. साकोली, जिल्हा भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था व तहसील कार्यालय, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयीन, पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “अमृत संवाद सेतु” हा सामाजिक उपक्रम तसेच mpsc\upsc स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन शिबिर विशेष उपक्रम तहसील कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती देणे, शासन व्यवस्था समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयला भेटी देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. ‘अमृत संवाद सेतू‘ हा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग, अधिकारी व नागरिक यांच्यातील संवादाचे महत्त्व आणि प्रशासनाविषयीची समज वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा सामाजिक उपक्रम आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासकीय विभागांची रचना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, नागरिकांसाठी उपलब्ध सेवा आणि प्रशासनाची कार्यपद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशासनातील विविध बाबी समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज व निवेदन लेखन, शासकीय कामकाजाचा पाठपुरावा, तक्रार निवारण प्रक्रिया, माहितीचा अधिकार अधिनियम (RTI), शासन निर्णय (GR), ऑनलाइन शासकीय सेवा व सुविधा यांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता शासन व्यवस्था, सामाजिक प्रश्न आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम, सजग आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वा. तहसील कार्यालय, साकोली येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. अमृत जिल्हा कार्यालय, तळ मजला, श्री साई किराना घर, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भंडारा येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, अग्रवाल, भूमिहार व हिंदू वीर शैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment