महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने आयोजित अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचे उद्घाटन भारत माता पूजनाने करण्यात आले.
मालेगाव
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधी समाजाचे सेक्रेटरी व टॅक्स कन्सल्टंट श्री. मुकेश जनानी तसेच हिंदू वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष व महेश को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर श्री. सचिन पाळेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुकेश जनानी यांनी प्रशिक्षणार्थींना व्यवसाय करताना आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवण्याचे महत्त्व सांगितले. तसेच आयकर, टॅक्स व जीएसटी याबाबत सविस्तर माहिती देत व्यवसायातील करप्रणाली समजून घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले.
सचिन पाळेकर यांनी प्रशिक्षणार्थींना बँक कर्ज, बँकेचे विविध व्यवहार, कर्ज घेताना आवश्यक बाबी तसेच बँक व्यवहार कशा पद्धतीने हाताळावेत याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अमृत संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री. दीपक गुप्ता यांनी केले. प्रशिक्षणार्थींनी दोन्ही मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे घेतले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, आर्थिक नियोजन, बँकिंग व्यवहार आणि शासकीय योजनांची माहिती मिळणार असून, स्वावलंबी उद्योजक घडविण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment