विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची कार्यपद्धती, विविध विभागांची जबाबदारी तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची प्रत्यक्ष माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने ‘अमृत शासन संवाद सेतू’ उपक्रमाचे आयोजन राजुरा तहसील कार्यालयात करण्यात आले. या उपक्रमात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), राजुरा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील दैनंदिन प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विभागनिहाय कार्यपद्धती, जबाबदाऱ्या तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवांची माहिती सविस्तरपणे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
प्रशासनाची कार्यपद्धती केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेता यावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज, नागरिकांच्या अर्जांवरील कार्यवाही आणि शासकीय सेवांची अंमलबजावणी याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्यामध्ये प्रशासनाविषयी अधिक जिज्ञासा निर्माण झाली.
यावेळी कृषी अधिकारी, राजुरा यांनी विद्यार्थ्यांना कृषी विभागाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, शासकीय सेवा, अर्ज प्रक्रिया तसेच विभागाची भूमिका याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रश्न विचारून कृषी विभागाच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा येथील प्राध्यापक दीपक पुणेकर, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक आदित्य सेंगर आणि अमृत मित्र सतीश नारायणदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment