ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी व त्यांच्या टीमच्या हस्ते अमृत छत्रपती संभाजीनगर कार्यालयात श्री गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीत अमृतच्या विविध योजना, उपक्रम व प्रशिक्षणांची माहिती महिलांना देण्यात आली
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी व त्यांच्या टीमच्या शुभहस्ते श्री गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी ब्राह्मण महिला मंचाच्या रश्मी कुमठेकर, राधिका ठोसर, सारिका पाठक, मृदुला शेपाळ, मनीषा खडके, अनिता इनामदार, तनिषा पराडकर, ज्योती कुलकर्णी, विनया कुलकर्णी आणि गायत्री दसरे यांची उपस्थिती होती.
आरतीनंतर ब्राह्मण महिला मंचाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अमृत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणांची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली. अमृतच्या योजनांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात ब्राह्मण महिला मंचाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment