अकोल्यात दोन दिवसीय ‘अमृत पेठ’ भरविण्यात येणार; नवरात्री स्पेशल प्रदर्शनासह मोफत आरोग्य तपासणीची संधी
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने नवरात्रीनिमित्त ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ या दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन दि. २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा उपक्रम गायत्री मंदिर, गायत्री नगर, हिंगणा रोड, कौलखेड, अकोला येथे दररोज सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात स्थानिक उद्योजक, महिला बचतगट आणि अमृतच्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे थेट प्रदर्शन व विक्री होणार आहे. साड्या, कुर्ती, ज्वेलरी, क्रीम व कॉस्मेटिक्स, घरगुती वापराच्या वस्तू, विविध सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, सुंदर ब्लाऊज तसेच खरे व रोपवाटिकेतील रोपे अशा अनेक उत्पादनांची रेलचेल या बाजारपेठेत पाहायला मिळणार आहे. उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याने दर्जेदार वस्तू वाजवी दरात खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या सुविधेचाही लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याशिवाय प्रदर्शनादरम्यान खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉद्वारे पैठणी भेट देण्यात येणार असून त्यामुळे उपक्रमात अधिक आकर्षण निर्माण झाले आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ला अकोलेकरांनी कुटुंबीयांसह आवर्जून भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment