५२ विद्यार्थ्यांना शारीरिक व बौद्धिक व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रभक्ती व नेतृत्वगुणांचे धडे; भविष्यात २० पेक्षा अधिक अमृत वर्ग सुरू करण्याचा मुख्याध्यापक श्री. पंकज दात्रे सरांचा विश्वास.
सटाणा :- दि. २३ सप्टेंबर २०२६ : मल्हार हिल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. अमृत संस्थेचे प्रशिक्षक कैलास कुरकुटे यांनी सुमारे ५२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणात प्रार्थना, शीतलीकरणाचे व्यायाम, बैठकीतील व मैदानी खेळ, आज्ञा-अभ्यास, कृतीयुक्त गीते, प्रेरणादायी गोष्टी, राष्ट्रीय घोषणा आणि शांतिमंत्र यांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून या उपक्रमांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. अमृत वर्गामुळे व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थी हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवून भविष्यात २० पेक्षा अधिक अमृत वर्ग घेतील, असा विश्वास मुख्याध्यापक श्री. पंकज दात्रे सर यांनी व्यक्त केला. यावेळी नाशिक जिल्हा उपव्यवस्थापक संजय गोसावी, आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment