परभणीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

उद्योजकीय मानसिकता, आत्मविश्वास आणि संधी शोधण्याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

परभणीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्य फोटो
परभणीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त फोटो

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने परभणी येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अमितजी सामंत व विभागीय उपव्यवस्थापक ओंकारजी शेटे यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्योजकतेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, उपलब्ध संधी ओळखून त्यांचे व्यवसायाच्या संधींमध्ये रूपांतर करण्याची क्षमता विकसित करणे, युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षक चंद्रशेखर अळनुरे यांनी प्रशिक्षणार्थींना ‘उद्योजकीय मानसिकता’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल किंवा व्यवसायाची कल्पना पुरेशी नसून, योग्य मानसिकता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आत्मविश्वास, उपलब्ध संधी शोधणे व नव्या संधी निर्माण करणे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता (Risk Taking), संघटन कौशल्य, आवश्यक व्यावसायिक कौशल्ये, उपक्रमशीलता तसेच विविध आव्हाने स्वीकारून त्यावर मात करण्याची वृत्ती या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.

व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींकडे समस्या म्हणून न पाहता त्यातून नव्या संधी निर्माण करण्याची दृष्टी उद्योजकांनी विकसित करणे आवश्यक आहे, असेही प्रशिक्षणात सांगण्यात आले. बाजारपेठेतील बदल, ग्राहकांच्या गरजा, उपलब्ध संसाधने आणि स्वतःच्या कौशल्यांचा योग्य मेळ घालून व्यवसायाची दिशा निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 16 प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती, उद्योजकीय दृष्टिकोन आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement