उद्योजकांना केवळ व्यवसायाची कल्पना न देता आर्थिक नियोजन, बँकिंग प्रक्रिया आणि कर्ज व्यवस्थापनाचे ज्ञान देणे हे EDP प्रशिक्षणाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून, या सत्रातून प्रशिक्षणार्थींना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध आर्थिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात ‘बँक लोन प्रक्रिया व विविध कर्ज प्रकारांसाठी आवश्यक कागदपत्रे’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात पूर्णवादी नागरी सहकारी बँक, परभणीचे व्यवस्थापक श्री. धनंजय बक्षी यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज घेताना कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते, याची माहिती दिली. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी व्यावसायिक कर्ज, टर्म लोन, कार्यकारी भांडवल कर्ज, कॅश क्रेडिट आदी विविध कर्जप्रकारांची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक कर्जप्रकाराचा उद्देश, पात्रता, परतफेडीची पद्धत तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कर्जासाठी अर्ज करताना आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक स्टेटमेंट, उत्पन्नाचा पुरावा, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, व्यवसायाशी संबंधित परवाने व नोंदणी कागदपत्रे, आवश्यकतेनुसार तारण किंवा हमीदाराची कागदपत्रे आदी बाबींची आवश्यकता भासू शकते, याची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. तसेच कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवसायाची व्यवहार्यता, आर्थिक नियोजन, कर्जाची परतफेड करण्याची क्षमता, आवश्यक भांडवल आणि व्यवसायाचा अपेक्षित नफा यांचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे श्री. बक्षी यांनी स्पष्ट केले. बँकेकडे कर्ज प्रस्ताव सादर करताना प्रकल्पाची स्पष्ट माहिती आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास कर्जप्रक्रिया समजून घेण्यास व पुढे नेण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींना व्यवसायासाठी आवश्यक वित्तपुरवठा कसा उभारावा, बँक कर्जासाठी कोणती तयारी करावी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याबाबत व्यावहारिक माहिती मिळाली. सत्राच्या शेवटी प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्री. धनंजय बक्षी यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. अमृत संस्थेविषयी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी. येथे भेट द्यावी किंवा 7391065473 या क्रमांकावर संपर्क साधावा. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment