तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे; शासनाने उपलब्ध केलेल्या संधींचा लाभ घ्यावा - अमृत महाराष्ट्र

तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे; शासनाने उपलब्ध केलेल्या संधींचा लाभ घ्यावा

अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांचे उद्योजकता विकास कार्यशाळेत प्रतिपादन

तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे; शासनाने उपलब्ध केलेल्या संधींचा लाभ घ्यावा मुख्य फोटो
तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे; शासनाने उपलब्ध केलेल्या संधींचा लाभ घ्यावा अतिरिक्त फोटो

माजलगाव (जि. बीड) : 'तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळणे ही काळाची गरज असून, शासनाने उद्योग-व्यवसायासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत,' असे प्रतिपादन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या उद्योजकता विकास कार्यशाळेत व्याख्याते म्हणून बोलत होते. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धेश्वर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी होते. या वेळी अमृत संस्थेचे जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, अमृतमित्र सुमित धिरडे, बीड जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
विशाल जोशी यांनी अमृत संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. 'अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील तरुण व विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास, उद्योग प्रशिक्षण व स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. शासनाच्या सारथी, बार्टी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, विविध शासकीय विभाग व जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांद्वारे उद्योगासाठी भांडवल, प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. योग्य नियोजन, सातत्य व कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनू शकतात,' असे त्यांनी नमूद केले.

'उद्योग उभारणीत मार्केटिंग, संवादकौशल्य व सोशल मीडियाचा प्रभावी वापर अत्यंत महत्त्वाचा असून, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण घेऊन बँकेसमोर सुस्पष्ट प्रकल्प अहवाल सादर केल्यास भांडवल सहज उपलब्ध होऊ शकते. बँकेला व्यवसायाबाबत विश्वास वाटणे व परतफेडीची खात्री मिळणे आवश्यक असते,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनपर भाषणात अभय कोकड म्हणाले, की देश महासत्ता होण्यासाठी तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. विद्यार्थिजीवनातच लघुउद्योगाची सुरुवात केल्यास भविष्यात आर्थिक स्वावलंबन निश्चितच साध्य होऊ शकते.'
दुसऱ्या सत्रात जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी उद्योग नोंदणी प्रक्रिया, शासकीय अनुदान व विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी रांगोळी, मेंदी, फुलांची ज्वेलरी यांसारख्या छोट्या कौशल्यांतूनही यशस्वी व्यवसाय उभारता येतो, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. महेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश गटकळ यांनी केले, तर आभार प्रा. अशोक होके यांनी मानले.
कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. गजानन होंन्ना, डॉ. युवराज मुळ्ये, प्रा. अंकुश साबळे, पर्यवेक्षक प्रा. परमेश्वर खेत्री, प्रा. प्रवीण गिल्डा, प्रा. अभय येवतेकर, प्रा. नामदेव हेडे, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 371 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 371 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement