खुल्या प्रवर्गासाठीही काम करणारी संस्था आहे हे कळल्यावर झाला आनंद
माणगाव (जि. रायगड) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी माणगाव शहरात परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी लक्ष्यित गटातील अनेक महिला उपस्थित होत्या. अमृत संस्थेचे रायगड जिल्हा उपव्यवस्थापक मंगेश ढेबे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची उपस्थितांना सविस्तर माहिती करून दिली. अमृत संस्था कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये काम करते आणि अमृत संस्थेची उद्दिष्टे कोणती आहेत, याचीही सविस्तर माहिती मेळाव्यामध्ये करून देण्यात आली.
लक्ष्यित गटासाठीही कोणती तरी शासकीय संस्था काम करत आहे हे अनेकांना या मेळाव्यात पहिल्यांदाच माहीत झाले. त्यामुळे त्यांना आनंद द्विगुणित झाला. सर्व शंकांचे निरसन मंगेश ढेबे यांनी केले. उपस्थितांनी संस्थेचे आणि श्री. ढेबे यांचेही मनापासून आभार मानले. अमृत संस्थेच्या योजनांचा परिचय मेळावा उत्साहात पार पडला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment