मराठी पत्रकार दिन - अमृत महाराष्ट्र

मराठी पत्रकार दिन

आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले तो दिवस म्हणजे सहा जानेवारी.

मराठी पत्रकार दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. या नात्याने माध्यमांची जबाबदारी फार मोठी आहे. वृत्तपत्रांची सुरुवात जनशिक्षणाचे माध्यम म्हणूनच झाली. मराठीतले पहिले वृत्तपत्र म्हणजे दर्पण. त्याच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. २० फेब्रुवारी १८१२ रोजी आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावी एका सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांना अवघ्या ३४ वर्षांचे आयुष्य लाभले; पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू केल्याने हा दिवस 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

१९व्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली होती, त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे उच्चविद्याविभूषित, तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व काम करत होते. दर्पण सहा जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाले आणि अवघ्या विशीत बाळशास्त्री जांभेकरांनी संपादकपदाची धुरा सांभाळली. जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. दर्पण साडेआठ वर्षे चालले. जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. समाजातील वर्णव्यवस्था, जातिभेद, स्त्री दास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांवर त्यांनी लेखन केले.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण त्यांना होती.

पत्रकारिता हे केवळ उत्पन्नाचे साधन नाही, तर ते एक व्रत आहे. सत्य आणि विश्वासार्ह बातमीच प्रकाशित करण्याचा वसा आजच्या काळातही कायम राखला जाण्याची गरज आहे.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 317 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 317 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement