भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले कौतुक
बीड : खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास समाजघटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व अमृतमित्र सुमित धिरडे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम, लक्ष्यित गट व समाजासाठी सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. अमृत संस्था कोणासाठी कार्य करते, खुल्या प्रवर्गातील समाजघटकांसाठी स्वतंत्रपणे उभारलेली ही चळवळ किती महत्त्वाची आहे, यावर या वेळी सखोल चर्चा झाली. अमृत संस्थेचे कार्य केवळ योजना राबवण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील दुर्लक्षित घटकांना संधी, दिशा आणि आत्मविश्वास देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी धारूरचे माजी नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, भाजप जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, ब्राह्मण संघर्ष समितीचे प्रमोद पुसरेकर, राजेंद्र चरखा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही अमृत संस्थेच्या उपक्रमांबाबत माहिती घेत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. शंकर देशमुख यांनी यापूर्वीही अमृत संस्थेला विविध स्तरावर सहकार्य केलेले असून, ते स्वतः अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील असल्यामुळे संस्थेबाबत त्यांना विशेष आत्मीयता असल्याचे या वेळी प्रकर्षाने जाणवले.
अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती ऐकून शंकर देशमुख यांनी समाधान व्यक्त करून, समाजाच्या गरजेनुसार उभ्या राहिलेल्या या संस्थेला पुढील काळातही आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. अमृत संस्थेच्या कार्यामुळे खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना नवे व्यासपीठ मिळत असून, ही चळवळ अधिक व्यापक होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अमृत संस्थेला मिळणारा हा सातत्यपूर्ण पाठिंबा संस्थेच्या कामाला नवी ऊर्जा देणारा ठरणार असून, समाजातील विविध घटकांपर्यंत अमृतचे उपक्रम अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment