उद्योग-व्यवसायासाठी खुल्या प्रवर्गाने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे नर्ले (सांगली) येथील मेळाव्यात आवाहन
नर्ले (ता. वाळवा, जि. सांगली) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने नर्ले ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने नर्ले येथे अमृत मेळावा आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करते. त्यात ब्राह्मण समाजाचाही समावेश होतो. या संस्थेच्या योजनांची ब्राह्मण समाजाला व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. प्रवीण कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे आणि वैभव जोशी यांनी अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नोकरीसाठी समाजाला स्थलांतर करावे लागत असून, त्यावर काही उपाय शोधणे आवश्यक असल्याचे प्रास्ताविकात अवधूत कुलकर्णी यांनी सांगितले. आपल्या समाजातील व्यावसायिक व महिलांना उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्थेच्या योजना उपयोगी असून त्यांचा समाजाला लाभ व्हावा, यासाठी हा मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन केले. ब्राह्मण समाजातील तरुण पिढीने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योग उभे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. उद्योग-व्यवसाय उभे केल्यास ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतराच्या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारोपात प्रवीण कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे आणि उपस्थितांचे आभार मानले. तसेच समाजबांधवांनी व भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अमृतमित्र म्हणून समाजजागृतीचे काम स्वयंसेवी पद्धतीने करण्याची तयारी दर्शवली. या कार्यक्रमाला सर्व वयोगटांतील समाजबांधव उपस्थित होते. वाळवा तालुका ब्राह्मण महिला आघाडीच्या सौ. अनघा कुलकर्णी, डॉ. शरद कुलकर्णी, विश्वास जोशी, नरेंद्र कुलकर्णी, गोपाल जोशी, संदेश कुलकर्णी, अभिजित कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शैलेंद्र जहागीरदार
९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
सांगली जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment