'बार्टी'चे प्रतिनिधी सागर जाखोटिया यांची 'अमृत'च्या अमरावती कार्यालयाला भेट
अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी सागर जाखोटिया यांनी अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, तसेच अमृत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण व उपक्रमांची माहिती देण्यात आली. या वेळी सागर जाखोटिया यांना अमृत दिनदर्शिका भेट देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment