ब्राह्मण आणि आर्यवैश्य समाजाच्या बैठकीला चांगला प्रतिसाद
नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या योजना आणि उपक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये संस्थेच्या लक्ष्यित गटातील ब्राह्मण आणि आर्यवैश्य समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. धर्माबादमध्ये लवकरच अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) कार्यक्रम राबवण्याबद्दल या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी उपस्थितांना अमृत संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. तसेच, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांकरिता संस्थेकडून राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. महेश जोशी यांनी या बैठकीच्या आयोजनासाठी मदत केली. ते वैदिक ब्राह्मण आणि उद्योजक आहेत. बैठकीत सहभागी झालेल्या काही जणांनी अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठीची कागदपत्रे गोळा करून ते लवकरच अर्ज करणार आहेत. धर्माबादमध्ये लवकरच अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) कार्यक्रम राबवण्याबद्दल या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, बैठकीच्या प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 1 Comments
Mahesh joshi
खूप छान माहिती दिली विश्वेश्वर सरांनी. आणि सरकार ची खूप चांगली योजना आहे . आणि धर्माबाद कर लवकरच या सर्व योजनेचा लाभ घेतील
Write a Comment