राजा बढे - अमृत महाराष्ट्र

राजा बढे

'गर्जा महाराष्ट्र' या गाण्याचे शिल्पकार राजा बढे यांचा एक फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

राजा बढे मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या निमित्ताने राजा बढे यांनी रचलेल्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या स्फूर्तिगीताला श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आणि शाहीर साबळे यांनी ते बुलंद आवाजात गायले. या गीताची आजही मराठी मनाला भुरळ पडते. आता तर त्याला महाराष्ट्राच्या अधिकृत राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. या गीताचे रचनाकार राजा बढे यांचा एक फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा थोडक्यात परिचय...

राजा बढे हे लेखक, संपादक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, चित्रपट अभिनेते, निर्माते, गायक, कवी आणि गीतकार असे बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व होते. त्यांचा जन्म एक फेब्रुवारी १९१२ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव राजा नीळकंठ बढे. त्यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा व माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावंडांचे पालनपोषण केले. मॅट्रिकनंतर नोकरी पत्करली. त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. भावंडांचे पालनपोषण नीट व्हावे म्हणून त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी मराठीतील नावाजलेल्या विविध वृत्तपत्रांमध्ये विविध ठिकाणी नोकरी केली. नियतकालिके व साप्ताहिकांमध्येही लेखन केले. 'कोंडिबा' या टोपणनावाने त्यांनी राजकीय वात्रटिका लिहिल्या. 

राजा बढे यांचा संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. गीत, गझलांबरोबरच चारोळीरचनाही केल्या. त्यांनी १९४०च्या सुमारास 'सिरको फिल्म्स'च्या माध्यमातून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. दोन वर्षे तेथे काम करून १९४२ मध्ये ते प्रकाश स्टुडिओत रुजू झाले. त्यांनी 'रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. 'धाडिला राम तिने का वनी' या नाटकासाठी त्यांनी 'अभिरामा सुखधामा' हे नाट्यगीत लिहिले व पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी ते गायले. आपल्या बंधूंच्या साह्याने बढे यांनी 'स्वानंदचित्र' ही चित्रपट संस्था स्थापन केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'रायगडचा राजबंदी' हा चित्रपट काढला. याच चित्रपटासाठी त्यांनी रचलेले 'उधं गं अंबे उधं' हे लोकगीत शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी गायले. 

बढे यांनी आकाशवाणीवर निर्माता म्हणून १९५६ ते १९६२ या कालखंडात त्यांनी काम केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट निर्माण केला. त्यांनी रचलेली 'कळीदार कस्तुरी पान' ही लावणी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली व सुलोचना चव्हाण यांनी गायली. त्यांच्या कवितांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रभाव दिसतो. 'क्रांतिमाला' या त्यांच्या संग्रहात देशभक्‍तिपर २१ कविता आहेत. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये १८ काव्यसंग्रह, चार नाटके, नऊ संगीतिका, पाच एकांकिका, एक कादंबरी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा प्राचीन राजा हाल सातवाहन याच्या काव्यांचे संकलन असलेल्या 'गाथा सप्तशती'चा मराठी अनुवाद त्यांनी केला. अशा या थोर साहित्यिकाचे सात एप्रिल १९७७ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement