जिल्हा उद्योग केंद्र अजयकुमार पाटील यांच्याशी बैठकीत झाली सकारात्मक चर्चा
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. अमृत संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या समन्वयातून रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास व स्थानिक उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने भविष्यात संयुक्त उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीत अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती पाटील यांना देण्यात आली. या वेळी अमृत संस्थेची दिनदर्शिकाही पाटील यांना भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ 'अमृत'च्या लक्ष्यित गटातील युवक, महिला नवउद्योजक व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अजयकुमार पाटील यांनी या बैठकीमध्ये दिले.
या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक साह्य, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन मिळू शकते. अमृत संस्थेच्या माध्यमातून योग्य लाभार्थ्यांची निवड, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शन झाल्यास या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या भेटीमुळे अमृत संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून जिल्ह्यातील रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना गती मिळेल, असेही सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment