वीस लाभार्थ्यांचा सहभाग; पुढील तुकडीसाठी नावनोंदणी सुरू
अहमदपूर (लातूर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन अर्थात ईडीपी या दहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची अहमदपूर येथे उत्साहात सुरुवात झाली. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय अधिकारी ओमकर शेटे उपस्थित होते.
अहमदपूरमधील सरस्वती कम्प्युटर सेंटरमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आहे. उद्घाटनप्रसंगी उद्योजक प्रवीण गादेवार, प्रशिक्षक मिलिंद आंबेकर व श्याम सुंदर, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक विनोद अपसिंगेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षकांची लाभार्थ्यांशी ओळख करून देण्यात आली. या प्रशिक्षणात २० लाभार्थी सहभागी झाले असून, लक्ष्यित गटातील व्यावसायिकांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये, नियोजन यांबद्दल मार्गदर्शन करणे हा त्यामागचा उद्देश आहे. पहिल्या दिवशी मिलिंद आंबेकर यांनी 'व्यवसाय व उद्योजकतेची ओळख' या विषयावर मार्गदर्शन केले. गेल्या १८ वर्षांपासून ते यशदा संस्थेमार्फत व इतर संस्थांमार्फत ग्रामीण भागात प्रशिक्षण देत आहेत.
दुसरे प्रशिक्षक श्याम सुंदर यांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी व्यवसायाच्या संधी, कौशल्यविकास, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी, तर सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक विनोद अपसिंगेकर यांनी केले.
अमृत उद्योग कौशल्यवर्धन ईडीपी प्रशिक्षणाच्या पुढील तुकडीसाठी नोंदणी सुरू असून, इच्छुक लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या लातूर जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम सुहासराव मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
विनोद विजयराव अपसिंगेकर - 7499424355
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : जिल्हा कार्यालय - अमृत,
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर,
लातूर, ता. जि. लातूर - 413512
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment