लक्ष्यित गटातील प्रतिनिधींनी व्यक्त केले समाधान
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते. या पार्श्वभूमीवर, कोल्हापुरात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील काही प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांना अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्यात आली. या वेळी अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमाचे राजन डांगरे, तसेच अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी, मीटिंग कॉर्डिनेटर पूजा मॅडम यांच्यासह अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील प्रतिनिधी म्हणून नितीश भागवत, केदार पारगावकर, अभयकुमार नेर्लेकर, पराग कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हॉटेल कृष्णा इन या हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. प्रशांत जोशी यांनी या वेळी अमृत संस्थेची आणि योजनांची माहिती दिली. उद्योजक घडवण्यासाठी कौशल्य उद्यम प्रशिक्षण देऊन सक्षम उद्योजक घडवले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य उद्यम प्रशिक्षण, व्यावसायिक कर्जावर व्याजपरतावा व उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृत संस्थेचे विशेष प्रयत्न याबद्दलदेखील या वेळी माहिती देण्यात आली. उद्योजकांना ट्रिपल इंजिनचे बळ देऊन सक्षम बनवून त्यांना उद्योगजगतामध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
राजन डांगरे यांनी अशा प्रकारच्या बैठका वारणा कोडोली, नृसिंहवाडीजवळील कुरुंदवाड, गारगोटी आणि अन्य ठिकाणी घेतल्या आहेत. त्यातून आगामी काळात अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रम जोमाने सुरू होणार आहे, असा विश्वास राजन डांगरे यांनी या वेळी व्यक्त केला. डांगले यांनी आपल्या प्रशिक्षणकार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक, सुसज्ज बैठकव्यवस्था, स्वच्छता व्यवस्था व इतर तांत्रिक व्यवस्थांनी सज्ज असलेले प्रशिक्षणस्थळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित असलेल्या लक्ष्यित गटातील प्रतिनिधींनीदेखील योजनांचा लाभ घेण्याचे आश्वासन दिले आणि अमृत संस्था, तसेच योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत करू, असा विश्वास व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment