सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आत्मसन्मानाच्या पातळीवर हिंदुत्वाची संकल्पना मांडणाऱ्या द्रष्ट्या नेत्याच्या विचारांना उजाळा
रत्नागिरी : क्रांतिकारी विचारांचे तेजस्वी प्रतीक असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (२६ फेब्रुवारी) अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या कोकण विभागातर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अमृत संस्थेच्या रत्नागिरी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावरकरप्रेमी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आणि अमृत संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा गौरव करून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सावरकरांचे विचार आजही समाजाला राष्ट्रप्रेम, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते थोर विचारवंत, कवी, लेखक, राष्ट्रजागरण करणारे द्रष्टे नेते आणि हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड होते. परकीय सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी अंदमानातील काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा सोसली; मात्र राष्ट्रभक्तीची ज्योत क्षीण होऊ दिली नाही. हिंदुत्व ही संकल्पना त्यांनी सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आत्मसन्मानाच्या पातळीवर मांडली. 'एक देश, एक संस्कृती, एक राष्ट्रभाव' या विचारांनी त्यांनी तरुणाईला प्रेरणा दिली. आजही त्यांचे विचार राष्ट्रनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरतात, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि 'सौभाग्य अलंकर' या प्रसिद्ध पेढीचे स्वप्नील उर्फ बच्चूशेठ सैतवडेकर, रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर व सामाजिक कार्यकर्ते अण्णा शिंदे, तसेच 'श्रावणी ग्राफिक्स'चे प्रमुख उमेश महामुनी उपस्थित होते. या वेळी अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, 'अमृत महाराष्ट्र'चे प्रमुख महेश गर्दे, जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये व अमृतसखी ऋचा बापट यांचीही उपस्थिती होती.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment