उद्योजक आणि ग्राहक यांच्यामधील उत्तम सेतू
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमरावतीमध्ये अमृतपेठ प्रदर्शन आयोजित केले आहे. सहा मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता अमरावती महानगरपालिकेचे महापौर चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. बडनेरा रोडवरील जाधव पॅलेसमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
स्थानिक उद्योजकांना आपली उत्पादने व सेवा सादर करण्यासाठी, तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध क्षेत्रांतील उद्योजक स्टॉल्स मांडून ग्राहकांसमोर आपली उत्पादने व सेवा मांडणार आहेत. ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन दर्जेदार स्वदेशी उत्पादने खरेदी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महापौर चंद्र लक्ष्मणदास तेजवानी यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. या वेळी त्यांनी महापौरांना अमृत संस्थेच्या विविध योजना, तसेच अमृतपेठ प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. तेजवानी यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण अगत्याने स्वीकारले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment