अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या हस्ते प्रकाशन
श्रीरामपूर (अहिल्यानगर) : घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने श्रीरामपूरमध्ये ब्राह्मण समाजातर्फे 'जय परशुराम' या नावाचे मासिक ब्राह्मण युवा संघटनेच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. श्रीरामपूरमधील शासकीय विश्रामगृहात अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन झाले. समाजातील अडीअडचणी समाजापुढे मांडणे, संस्कार, संस्कृती, धार्मिकता, व्रतवैकल्ये यांची व शासकीय योजनांची संपूर्ण माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे मासिकाचे मूळ उद्देश आहेत.
सागर भोपे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. हा एक उत्तम उपक्रम ब्राह्मण युवा संघामार्फत राबवण्यात येत असून, या उपक्रमाला अमृत संस्थेमार्फत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या मासिकाचे लवकरात लवकर दैनिकात रूपांतर होवो, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. या वेळी भोपे यांनी उपस्थित सर्व समाजबांधवांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली आणि या मासिकामार्फत अमृत संस्थेच्या योजनांचा प्रभावी प्रसार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अमृत ही संस्था ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे.
या वेळी जय परशुराम मासिकाचे संपादक प्रतीक वैद्य यांनी मासिकाची रूपरेषा, उद्दिष्टे यांची माहिती दिली. कार्यकारी संपादक सुबोध शेवतेकर यांनी अध्यक्षीय सूचना मांडून आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी मासिकाला शुभेच्छा दिल्या आणि समाज भक्कमपणे पाठीशी उभा आहे असे आश्वासन दिले. ब्राह्मण युवा संघाचे प्रथमेश जोशी यांनी मासिकाचा प्रस्ताव मांडला. ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक के. टी. जोशी, वासुदेव काळे, संजय पुराणिक, प्रवरा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण, गोविंद केंगे यांनी अनुमोदन देऊन मासिकाला शुभेच्छा देणारे आपले मनोगत व्यक्त केले आणि मासिकाला भक्कम पाठिंबा दर्शवला.
या वेळी ब्राह्मण युवा संघाचे रुद्रप्रताप कुलकर्णी, पुष्कर जोशी, ओंकार कुलकर्णी, श्रेयस सुवर्णपाठकी, पीयूष शेवतेकर व ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बोलके, अनिल कुलकर्णी, आदिनाथ जोशी, गणेश जोशी, डॉ. गणेश जोशी, सुरेश मुळे, सुनील सुतावणे, योगेश ओझा, अभिजित मुळे, जगदीश मेंगदे, चंद्रशेखर कुलकर्णी, काशिनाथ सराफ, राजेंद्र संभूस, महेश देशपांडे, अजित निलाखे, श्रीधर बेलसरे, प्रोफेसर नागेश नाईक, महिला मंडळातील सौ. नूतन जोशी, विद्या क्षीरसागर आदी समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभिजित कुलकर्णी यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत कार्यालय : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment