महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेशी वॉशिंग्टन विद्यापीठाची धोरणात्मक भागीदारी - अमृत महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेशी वॉशिंग्टन विद्यापीठाची धोरणात्मक भागीदारी

नवउद्योजक घडवण्यासाठी अमृत संस्था करत असलेल्या दर्जेदार प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय पाठबळ

महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेशी वॉशिंग्टन विद्यापीठाची धोरणात्मक भागीदारी मुख्य फोटो
महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेशी वॉशिंग्टन विद्यापीठाची धोरणात्मक भागीदारी अतिरिक्त फोटो

पुणे : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नव्याने उद्योग सुरू करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने नुकतीच आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वपूर्ण पावले पडली आहेत. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (WUST) फाउंडेशन आणि स्टार्टअप्स व एंटरप्रेन्युअर्ससाठीचे या विद्यापीठाचे इन्क्युबेशन सेंटर यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेशी स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन अर्थात धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवर उद्योजकता विकास साध्य होणार आहे. तसेच, नवउद्योजकांना म्हणजेच स्टार्टअप उद्योग सुरू करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार/पात्रतेनुसार अमेरिकेतूनही साह्य मिळू शकणार आहे. वॉशिंग्टन विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाने अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून या भागीदारीची घोषणा केली आहे. या वेळी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यकारी संचालिका प्रिया कोठारी यांच्यासह विद्यापीठाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना अन्य कुठलीही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. अमृत संस्थेचे मुख्यालय पुण्यात असून, या संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादी सुमारे २२ जातींचा समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. या लक्ष्यित गटांतील उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अमृत संस्थेतर्फे उद्योजकता विकासाचे अनेक प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क राबवले जातात. त्यामुळे कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीला हातभार लागत असून, या उमेदवारांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास मिळत आहे. त्यात ड्रोन पायलट, सौर ऊर्जा युनिट इन्स्टॉलेशन, आयात-निर्यात, बेकरी, ब्युटी पार्लर अशा अनेक दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. अमृत संस्थेच्या या कार्याची दखल वॉशिंग्टन विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाने घेतली असून, त्यामुळेच या भागीदारीचा प्रस्ताव त्या विद्यापीठाने ठेवला. वॉशिंग्टन विद्यापीठाची धोरणात्मक भागीदारी अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांना जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठाने जाहीर केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, अमृत संस्थेशी झालेल्या भागीदारीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींना चालना मिळणार आहे. नवा उद्योग सुरू झाल्यानंतर तो स्थिरस्थावर होईपर्यंतच्या कालावधीला इन्क्युबेशन पीरियड म्हणतात. त्या कालावधीसाठी स्टार्टअप कंपन्यांना जागतिक पातळीवरच्या उपाययोजनांचे साह्य या भागीदारीमुळे मिळू शकेल. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याच्या संधी सुलभ होऊ शकतील. इनोव्हेशन अर्थात नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचा मजबूत सेतू या भागीदारीमुळे उभारण्यास मदत होणार आहे. लाभार्थ्यांना जागतिक दर्जाचे मार्गदर्शक, प्रशिक्षण आणि संशोधनसंधी उपलब्ध होऊ शकतील. एकंदरीतच, जागतिक दर्जाच्या कौशल्यवृद्धीसाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल. 'एक्स्चेंज अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम'द्वारे यंग इनोव्हेटर्स अर्थात नवकल्पनांचे बीज रोवणाऱ्या तरुणांना कदाचित अमेरिकेत जाऊन काही कौशल्ये शिकण्याची संधीही मिळू शकते.

उद्योजकांना बळ देणे, नवकल्पनांना चालना देणे आणि जागतिक पातळीवर शाश्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक अशी इनोव्हेशन इकोसिस्टीम अर्थात नवकल्पनांना सक्षम करणारी परिसंस्था विकसित करण्यासाठी आम्ही अमृत संस्थेसोबत कार्यरत राहू, असे वॉशिंग्टन विद्यापीठाने म्हटले आहे.

.....

अमृत संस्थेचे कार्यालय राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात असून, इच्छुकांना त्या कार्यालयात संपर्क साधून योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेता येईल.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 01:12 PM News publication time | Views: 235 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-03-2026 News publication date | Time: 01:12 PM News publication time | Views: 235 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement