महिलांना करण्यात आले व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आणि जिल्हा कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तनिष गारमेंटच्या संचालिका सौ. राजश्री अतुल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातापूजनाने झाली. राजश्री कुलकर्णींनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देऊन व्यक्तिमत्त्व विकासाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अमृतपेठ - थेट बाजारपेठ या उपक्रमाबाबतही महिलांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. स्टॉल लावताना तो आकर्षक आणि व्यवस्थित असावा, ग्राहकांशी बोलण्याची पद्धत चांगली असावी, पोशाख नीटनेटका असावा, तसेच आपल्या उत्पादनाबाबतची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे सांगता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
अमृतसखी मंजू कुलकर्णी आणि ऋचा शर्मा यांनी अमृत संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच अमृतपेठ - थेट बाजारपेठ हा उपक्रम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून, जास्तीत जास्त महिलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मराठवाडा विभागातील अमृतसखी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. तसेच अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमात स्टॉल लावणाऱ्या अनेक महिलांनीही ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या वेळी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, तसेच अमृतमित्र रामेश्वर साळुंके हेही उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Sarika vikas pathak.
My own products. Tukamai pure cow ghee and millets products.
Write a Comment