मोबाइल फिल्म-मेकिंगचा दीड महिन्याचा कोर्स १९ डिसेंबर २०२५ रोजी अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयात सुरू झाला.
अमरावती : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत कौशल्य उपक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेला मोबाइल फिल्म-मेकिंगचा कोर्स १९ डिसेंबर २०२५ रोजी अमृत संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयात सुरू झाला. स्प्रिंग मीडिया कंपनीचे अश्लेष झांबरे व नहुष बडगे उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
मोबाइलच्या माध्यमातून दर्जेदार व्हिडिओनिर्मिती, पटकथालेखन, रील्स तयार करण्यापासून ते रिअल सिनेमापर्यंतचा प्रवास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कमी साधनांतून मोठी संधी कशी निर्माण करता येते, हे प्रत्यक्ष उदाहरणांतून सहभागी १२ युवक-युवतींना शिकविण्यात आले. यापुढे ऑनलाइन माध्यमातून, तसेच प्रात्यक्षिकांतून हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. हा कोर्स दीड महिन्याचा असून, थिअरीच्या चौपट प्रॅक्टिकल अनुभव अशी या कोर्सची रचना आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना डिजिटल माध्यमांमधून स्वावलंबी होण्याची नवी दिशा मिळाली असून, अनेक सहभागी तरुणांनी भविष्यात कंटेंट क्रिएशन व फिल्म-मेकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
रील्सपासून रिअल सिनेमापर्यंतचा प्रवास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत, हा कोर्स इतर तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे, असे मत विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी व्यक्त केले.
या वेळी अमृत जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, उपव्यवस्थापक हृषीकेश कथलकर, अमृत सखी अश्विनी पुसदकर आणि साक्षी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment