महाराणांच्या शौर्यगाथेला देण्यात आला उजाळा
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयात महाराणा प्रताप जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराणा टाइम्स साप्ताहिकाचे मालक-संपादक ललितसिंह बाच्छील, तसेच लायन्स क्लबचे मौसमसिंह ठाकूर आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाप्रमुख (सत्संग) विनय सोलंकी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील ठाकूर समाजाचे मान्यवर, तसेच वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे १२ सदस्य या वेळी उपस्थित होते. मान्यवरांनी भारतमातेच्या आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेतील प्रसंग, त्यांची युद्धनीती व युद्धावेळच्या सैन्याच्या सर्वांगीण नियोजनावर प्रकाश टाकण्यात आला. अमृतमित्र ललितसिंह बाच्छील यांचे महाराणा टाइम्स हे साप्ताहिक वृत्तपत्र ३० वर्षांपासून सुरू आहे. त्या निमित्ताने अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास यांनी त्यांचा सत्कार केला. सूरजसिंह ठाकूर या ठाकूर समाजातील ज्ञातिबांधवाने भारोत्तोलन क्रीडाप्रकारात ९३ किलो वजनी गटात राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. त्याच्या या कामगिरीचीही विशेष दखल या वेळी घेण्यात आली.
ठाकूर समाजातील ज्ञातिबांधवांना बोलावून एकत्रीकरण घडवून आणल्याबद्दल लायन्स क्लबचे मौसमसिंह ठाकूर यांनी अमृत संस्थेचे या वेळी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने आणि अल्पोपाहाराने झाली. सर्व उपस्थितांनी परिवार सर्वेक्षण अभियानात ज्ञातिबांधवांच्या १०० टक्के सहकार्याची आणि अमृत संस्थेच्या योजना जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. अमृतमित्र हेमंत चंदवासकर यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व अमृतसखी साक्षी जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment