स्वयंपाकाची आवड असलेल्यांना सुलभपणे व्यवसाय उभारण्याची संधी
पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने मोफत क्लाउड किचन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंपाकाची आवड असलेल्या, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेले युवक-युवती, महिला व नवउद्योजकांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
क्लाउड किचन म्हणजे काय, ते कसे सुरू करायचे, कमी गुंतवणुकीत व्यवसायाची उभारणी कशी करायची, मेनू प्लॅनिंग, फूड कॉस्टिंग, हायजीन, FSSAI व कायदेशीर नोंदणी, पॅकेजिंग, फूड सेफ्टी, स्विगी व झोमॅटो या प्लॅटफॉर्मवर किचन लिस्टिंग प्रक्रिया, ऑर्डर मॅनेजमेंट, डिलिव्हरी सिस्टीम, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, तसेच नफा वाढवण्याच्या युक्त्या याविषयी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, केवळ थिअरी नव्हे, तर प्रॅक्टिकल प्रशिक्षणावर अधिक भर, वास्तवातील केस स्टडीज ही या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटासाठी असेल. अमृत संस्थेच्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये स्वयंघोषणापत्र, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा/कॉलेजचा दाखला (जातीचा उल्लेख आवश्यक), उत्पन्न दाखला (आठ लाख रुपयांपेक्षा कमी), अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) यांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असून इच्छुकांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या पुणे जिल्हा कार्यालयाच्या 9112228767 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment