अमृत संस्थेचे नागपूर विभाग व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचा वर्धा ब्राह्मण सभेतर्फे गौरव - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेचे नागपूर विभाग व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचा वर्धा ब्राह्मण सभेतर्फे गौरव

अमृत संस्थेच्या सामाजिक, विकासात्मक आणि लोकाभिमुख कार्याची दखल

अमृत संस्थेचे नागपूर विभाग व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचा वर्धा ब्राह्मण सभेतर्फे गौरव मुख्य फोटो
अमृत संस्थेचे नागपूर विभाग व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचा वर्धा ब्राह्मण सभेतर्फे गौरव अतिरिक्त फोटो

वर्धा : सामाजिक ऐक्य, संस्कार आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपणारा सर्वशाखीय ब्राह्मण उपवर–वधू राज्यस्तरीय परिचय मेळावा वर्धा ब्राह्मण सभेच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सलग ३२ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला हा मेळावा समाजात विश्वास, नातेसंबंध आणि मूल्यांची दृढता अधिक बळकट करणारा ठरला. या वेळी अमृत संस्थेच्या सामाजिक, विकासात्मक व लोकाभिमुख कार्याची दखल घेऊन अमृत संस्थेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांचा गौरव करण्यात आला. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा सन्मान करण्यात आला. देवदत्त पंडित यांना सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे.

या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून हजारो ब्राह्मण बांधव व भगिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या माहितीपुस्तिकेमध्ये अमृत संस्थेचे माहितीपत्रकही प्रकाशित करण्यात आल्यामुळे वर्धा ब्राह्मण सभेच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या योजनांचा संदेश पुन्हा एकदा समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

या मंचावरून स्वावलंबन, कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अमृत संस्थेची जिल्हा कार्यालये कार्यरत असून, ती सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव खुली आहेत, हा विश्वास दृढपणे अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमस्थळ पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यातून या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व, लोकांचा सहभाग आणि संस्थांप्रति असलेला जनविश्वास स्पष्टपणे दिसून आला.

या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ परिचय मेळावा न राहता, समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा, स्वावलंबनाची प्रेरणा देणारा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा दाखवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 11:30 PM News publication time | Views: 5,750 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 11:30 PM News publication time | Views: 5,750 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement