हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले कौतुक
हिंगोली : अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने तयार केलेली अमृत दिनदर्शिका हिंगोली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना भेट म्हणून देण्यात आली. बोधवड यांनी या दिनदर्शिकेची प्रशंसा केली. दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊन योजनांचा प्रसार अधिक व्यापक पातळीवर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अभिमन्यू बोधवड म्हणाले, 'अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती अतिशय नियोजनबद्ध, स्पष्ट व ठळक स्वरूपात या दिनदर्शिकेत मांडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे.'
ही केवळ दिनदर्शिका नसून अमृत योजना, प्रशिक्षण उपक्रम, सामाजिक व विकासाभिमुख कार्यक्रमांची माहिती देणारे एक प्रभावी मार्गदर्शक साधन आहे, असे ते म्हणाले. अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारे कौशल्यविकास, स्वयंरोजगार, महिला व युवक सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रम समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिनदर्शिका महत्त्वपूर्ण ठरत असून, शासन व नागरिकांमधील दुवा म्हणून अमृत संस्था प्रभावी भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांच्यासह कर्मचारी, पदाधिकारी, तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेला चालना देणाऱ्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment