अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी घेतली ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांची भेट
कारंजादत्त (वाशिम) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमरावती विभागाचे व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे कारंजा येथील अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध योजनांवर त्यांनी चर्चा केली.
जास्तीत जास्त लाभार्थी कसे होतील आणि लक्ष्यित गटातील नवीन उद्योजक कसे उभे राहतील, याबद्दलही चर्चा झाली. कारंजा येथील गुरुमाऊलीचे मंदिर अध्यात्म व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त स्वयंरोजगार उभे होऊ शकतात, असा आशय प्रवीण कोळेश्वर यांनी मांडला. ब्राह्मण सभा पदाधिकारी प्रसन्न पळसकर, अभय खेडकर, सुधीर देशपांडे, समीर देशपांडे, अक्षय लोटे, अमृत संस्थेचे वाशिम जिल्ह्याचे व्यवस्थापक योगेश जोशी आणि त्यांचे सहकारी रोहित देशमुख या वेळी उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment