धुळ्यातील फॅशन डिझाइन कोर्समुळे झाली महिलांच्या आत्मविश्वासात वाढ
धुळे : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने धुळ्यात आयोजित केलेल्या महिन्याभराच्या फॅशन डिझाइन कोर्सची नुकतीच सांगता झाली. प्रशिक्षणाच्या समारोपावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक डिझाइन्सचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या महिलांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचे व आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आगामी काळात त्या यशस्वी उद्योजिका म्हणून उभ्या राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कोर्सला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना ड्रेस डिझाइन, पॅटर्न मेकिंग, कटिंग-शिवणकाम, कापड व रंगसंगती याबरोबरच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण काळात प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणार्थी महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया या कोर्सची उपयुक्तता दर्शवणाऱ्या आहेत. 'प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षणामुळे आमच्या कौशल्यात निश्चितच वाढ झाली असून, भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची प्रेरणा या कोर्समुळे मिळाली आहे,' अशी सहभागी महिलांची प्रातिनिधिक भावना आहे.
'या प्रशिक्षणामुळे मला फॅशन डिझायनिंगचे व्यावसायिक ज्ञान मिळाले असून, आता स्वतःचे बुटीक सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे,' अशी प्रतिक्रिया गीतांजली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
'आमच्यासारख्या महिलांसाठी अमृत संस्थेने दिलेले हे प्रशिक्षण संधींचे दार उघडणारे ठरले आहे. घरबसल्या रोजगार सुरू करता येईल, याची जाणीव झाली आहे,' असे मत कादंबरी कुलकर्णी यांनी सांगितले.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी नवी दिशा मिळाली असून, त्या यशस्वी उद्योजिका म्हणून उभ्या राहतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. भविष्यातही अशा रोजगाराभिमुख व कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी दिली.
या वेळी अमृतमित्र विलास चंद्रात्रे, अमृतसखी वैशाली कुलकर्णी, एमसीईडी प्रकल्प अधिकारी आरती शिरोलकर, भावना पवार, फॅशन डिझाइन ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका मीरा सरोज, प्रभा परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment