वडूजमध्ये अमृत संस्थेच्या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेतर्फे आवाहन
वडूज (जि. सातारा) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. वडूज (ता. खटाव) येथे महिला व युवतींसाठी फॅशन डिझायनिंग कौशल्य प्रशिक्षणाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमृत संस्थेचे सातारा जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार आणि विनायक पाठकजी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी सांगितले, की 'खुल्या प्रवर्गातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत. शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे.' मनोज मिरासदार व विनायक पाठकजी यांनी जिल्हा स्तरावरून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित केले. या बॅचमध्ये महिलांना आधुनिक फॅशन डिझायनिंग, कटिंग आणि शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र मिळेल. त्याचा उपयोग बँकेचे कर्ज मिळण्यासाठी होईल. त्यामुळे त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यास मदत होईल.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment